Featured Post

बंधन


ही कविता आहे वेगवेगळ्या नात्यांत स्वतःला घालून घेतलेल्या बंधनाची, जे बंधन दिसत नाही. पण हळू हळू ज्या तत्वांच्या आधारावर आयुष्य आखलं,जगलो, त्याचच अस्तित्व हे बंधन नाकारते.

कुठल्यातरी वळणावर हा निर्णय घ्यावाच लागतो की priority नक्की काय आहे?हा वैचारिक कोलाहल मांडणारी ही कविता ...
मऊ मुलायम गोधडीत कशी
गुरफटून बसली आहेत ती
उगीचच नाही बरं का
जीवापाड जपली आहेत ती
त्यांना स्पर्श आहे, वास आहे
आठवणी आहेत, भास आहे
ती आहेत म्हणून का माझा श्वास आहे?
कदाचित......
पण सांग ना मी काय जपू ?नाती का तत्व
कशाला देऊ मी महत्व?


थोडी संसारी आहेत ती- असणारच
रुसवे फुगवे थोडेफार दिसणारच
आणि ती आहेत म्हणून तर आधार आहे
असं कसं सोडणार त्यांना, मला घर-दार आहे
तू म्हणशील आता याला ममत्व बिमत्व
पण सांग ना मी नाती जपू ना.. की तत्व?


तत्वांचे काय रे? त्यांची फकीराची जात
तसं हल्ली कोणी त्यांच्या वाटेलाही नाही जात
आणि प्रसंगाच्या वेळी तत्व वगैरे का येतात?
कुणास ठाऊक कशाला एवढे गोडवे गातात?
कशाला त्यांना महत्व? मग जपू ना नातीच मी..


जिथे ओढ तिथे थोडी तडजोड
सगळं मानावं लागतच गोड
खुणा आहेत त्यांच्या देहावर, बुद्धीवर
त्यांनी केलय आत खोलवर एक घर
नाही.. मी नाही येणार ते सोडून आता
मी जपतेय नातीच ठरलयं... पण.... मग तत्व.....?

अगं कुठे एकमेकांसमोर सारखी उभी ठाकतात ती
तुला उगीचंच न जाणो एवढी कशाची भीती
अर्जुनासारखे क्वचितच अगदी एखाद्याला
तत्वांसाठी मारावीही लागतात नाती
आणि तत्वभेद असेल तर नसतातच ती खोल
मग बोलत राहतो आपण तेच तेच, गोल गोल
अन दोन्हीही निवडता येतचं खूपदा, जपत आपले स्वत्व
नातीही आणि तत्व...


अन कधी आलाच असा प्रसंग तुझ्यावर
की निवडावं लागेल त्यातले एकच काही
तर लक्षात ठेव श्रीकृष्णानं गीता
काही उगीचंच सांगितलेली नाही
मग उमगून येईल काय सांभाळायचे?
काय सोडायचे? काय निवडायचं?
कशाला महत्व.....
आणि खरा प्रश्न हा नाहीयेच...नाती का तत्व?

युगायुगांची निवड आहे ही
ममत्व का सत्व......?कल्याणी बोरकर

Popular posts from this blog

Marathi Kavita: माझा पाऊस

Vedic Astrology: Planetary Strengths or Graha Bala

Vedic Astrology: Bhava Calculation or Calculation of Cusps

Vedic Astrology: Calculation of Vimshottari Dasa